Wednesday, October 1, 2008

अव्यक्त प्रेमाची गोष्ट

एका मुलाला कॅन्सर होता. अवघ्या महिन्याचाच तो सोबती होता. तो रोज एका सीडीच्या दुकानावर जायचा. या दुकानात एक छानशी मुलगी होती. ती त्याला फार आवडायची. मनोमन तो तिच्यावर प्रेम करायचा. सीडी आणायला गेला की तिच्याशी गप्पा मारता मारता वेळ कधी संपायचा ते त्याला कळायचंही नाही. तिच्याशी बोलायला मिळतंय म्हणून तो अगदी रोज त्या दुकानावर जायचा. पण आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती तो कधीही करू शकला नाही. त्याचं तेवढं धाडसंच झालं नाही.
एका महिन्यानंतर दुखणं बळावलं आणि त्याचा मृत्यू झाला. तिच्यावरचं त्याचं प्रेम त्याच्या मनातच राहून गेलं.
बर्‍याच दिवस तो येत का नाही म्हणून सीडीच्या दुकानातली मुलगी एकदा त्याचा पत्ता शोधत घरी पोहोचली. घरी त्याची आई होती. आईला तिने त्याच्याविषयी विचारलं. त्या माऊलीच्या ओघळत्या आसवांनीच तिला सारं काही सांगितलं. त्याची आई तिला त्याच्या खोलीत घेऊन गेली.
त्या खोलीत गेल्यानंतर तिनं पाहिलं. सगळ्या सीडी जशा नेल्या तशाच ठेवल्या होत्या. न उघडता.
आता मात्र तिला रडू आवरेना. कारण माहितेय?
कारण तिनं त्याला लिहिलेली सगळी प्रेमपत्र त्या सीडीच्या पाकिटात तशीच राहून गेली. त्यानं न वाचता. तीही त्याच्यावर तितकंच उत्कट प्रेम करत होती. पण.....
म्हणून कुणावर प्रेम करत असाल तर त्या प्रेमाला वेळीच अभिव्यक्त करा. याबाबतीत कुसुमाग्रजांनी सांगितलेलं एवढं नक्कीच लक्षात ठेवा.
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,

बुरुजावरती झेंडयासारखा फडकू नकोस.
उधळून दे तूफान सगळं,

काळजामध्ये साचलेलं,

प्रेम कर भिल्लासारखं,

बाणावरती खोचलेलंमातीमध्ये

उगवूनसुद्धा,मेघापर्यंत पोहचलेलं.

Sunday, September 28, 2008

यशस्वी जिवनाची सुरेल सुत्रं

अनेक चढ-उतार येवुनही जीवनास यशापर्यंत नेण्याची आपली कसरत अजूनही सुरुच आहे. यशस्वी जीवनाच्या या कसरतीत सुरेल संगीताची साथ मिळत असेल, तर त्यापेक्षा दुसरे भाग्य ते कोणते? सा,रे,ग,म,प,ध,नि,सा मधले प्रत्येक अक्षर, जीवन सुखी, निरोगी आणि यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवते.

· सा : (सामंजस्य) नात्या-गोत्यांमधील गुंत्यामुळे जीवनात ताण-तणाव निर्माण होतो हे खरे असले, तरी नात्यांशिवाय जीवन अर्थहीन आहे। अर्थात, प्रत्येक नाते टिकविण्यासाठी सामंजस्य ठेवणे आवश्यक असते. हा समंजसपणा, थोडासा समजूतदारपणा हुशारी आणि सावधपणा असल्यास टिकून राहतो.


· रे : (रेग्युलॅरिटी) हे जीवन म्हणजे काही श्वासांचं वरदान आहे। या पृथ्वीतलावर जीवन जगण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला एक निश्चित कालमर्यादा दिली आहे. आपण जर रेग्युलॅरिटी म्हणजे नियमीतपणाने प्रत्येक काम करु लागलो, तर या ठराविक आयुर्मानात आपण आपली उद्दिष्टे पूर्ण करु शकतो.


· ग : (गडबड, गोंधळ) आयुष्यात कधीही गोंधळून जाऊ नका। कारण, या अशा गोंधळलेल्या अवस्थेतच आपल्याकडून जास्तीत जास्त चुका घडून येण्याची शक्यता असते.


· म : (मन) आयुष्यातले चढ-उतार, सुख-दु:ख, सर्व काही सहजगत्या स्वीकारण्यासाठी मन कणखर असणे आवश्यक आहे। जय-पराजय या दोन्ही गोष्टी या मनावर तर अवलंबून आहेत.


· प : (परमेश्वरावरील विश्वास) परमेश्वराला, द्वैत वा अद्वैत यापैकी कुठल्याही रुपात माना, त्याच्या दया, करुणा, प्रेम व न्यायावर अपार श्रध्दा व विश्वास असलेल्यांना आत्मिक बळ हे मिळतेच मिळते। त्याची प्रार्थना केल्याने अशक्य गोष्टही शक्य होते.


· ध : (धन) आयुष्यात पैशाला अनन्यसाधारण महत्व असले, तरी त्याच्यामागे अंधाधुंद धावण्याने, स्वत:चा विनाशच ओढवला जातो। म्हणून, धन म्हणजे खूप काही आहे, पण सर्व काही नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. प्रमाणिकपणाने आणि मेहनतीने कमावलेला पैसाच आयुष्यात सुख-समृध्दीसोबत समाधान आणू शकतो.


· नि : (स्वत:वर नियंत्रण ठेवा) वाणी, वर्तन आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्याने आयुष्यात सुखच सुख येते। वाणीवर नियंत्रण आणि क्रोधावर अंकुश ठेवल्याने खूप साऱ्या वाईट घटना टळल्या जाऊ शकतात. मधुन वाणीने, लोकांची मने जिंकली जाऊ शकतात.


· सा : (सावधपणा) बेसावधपणामुळे आयुष्याचे खूप नुकसान होते, हे काही वेगळे सांगायला नको. सावधानता बाळगून काम केल्याने, त्यात चूका घडून येण्याची शक्यताच संपते. आणि प्रत्येक काम, मनावर कुठल्याही प्रकारचा ताण न येता सहजगत्या पूर्ण होते.

संयम व सरळपणा :

अतिउत्साह टाळा. संयम आणि सरळपणाने वागा. अतिउत्साहीपणा आणि क्रोध कोणत्याच समस्येचे समाधान करुन शकत नाहीत. कोणत्याही समस्येचे निराकारण शांतता आणि संयमाद्वारेच केले जाऊ शकते. याउलट, संयम सोडल्याने अथवा क्रोध करण्याने किरकोळ समस्यादेखील उग्र रुप धारण करुन शकते. संयम आणि सरळपणा यांचा अभावच अपयशाला कारणीभूत ठरतो.

बघा विचार करा!

· ज्याने आपुलकी गमावली त्याने सर्वस्व गमावले.
· मन प्रसन्न ठेवल्याने दु:खे दूर होतात, बुध्दी स्थिर राहते.
· सर्वांवर प्रेम करा, काही जणांवर विश्वास ठेवा, वाईट मात्र कोणाचेच करु नका।
· सत्य कशाच्या बाहेर नाही तसेच सत्याच्या बाहेरही काही नाही.

करिअरमधील यशासाठी

आपल्या करिअरचा ग्राफ उंचावत जावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. करिअरमध्ये यश मिळविण्याचे काही बेसिक नियम असतात ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या ते नियम.

आपल्या चुकांपासून शिका : जे स्वबळावर यश मिळवू इच्छीत असतता ते आपल्या चुकांतून धडा घेणे जाणत असतात. आपल्या विचारात सकारात्मक बदल करुन मार्गात येणा-या छोटया मोठया अडचणींवर मात करा.

सल्ला घेण्यास तत्परता दाखवा : यशाच्या मुख्य नियमातील दुसरा महत्वाचा नियम इतरांचे ऐकून घेणे यातून आपल्याला महत्वाचे टर्निग पॉइंटही मिळू शकतात.

विलंब टाळा : सुसंधी कोणाची वाट पहात नसते. आणि गेलेली वेळही परतून येत नसते. यासाठी कोणतेही काम वेळीच पूर्ण करा.

हाती घ्याल ते तडीस न्या : विलंबानंतरचा महत्वाचा इशारा म्हणजे एखादया कामाला सुरुवात केल्यानंतर कितीही अडचणी आल्या तरी ते पूर्ण करा. परंतू त्यासाठी शॉर्टकर्ट वापरु नका.

वेगळे काम करा : आखीव, रेखीव रुळलेल्या मार्गाने काम केल्यास यश मिळत नाही. अपयशी माणसांचा एक सर्वसामान्य दोष म्हणजे ते नेहमी नवे काही करुन दाखविण्याची व कष्ट करण्याची टाळटाळ करतात.

इतरांना दोष देऊ नका : वेळेचा अपव्यय व कामात रस न घेणे हे अपयशाला कारणीभूत असतात, अपयशी माणसे स्थिती सुधारण्याऐवजी इतरांना दोष देत राहतात.

कंपनीची निवड दक्षतेने करा : अपयश अपयशी लोकांकडे खेचते. यशस्वी व्यक्ती यशस्वी व्यक्तींकडेच जातात हे लक्षात ठेवूनच जॉब स्विकारा.

ध्येय निश्चिती

आपली झेप कुठवर जाऊ शकते, याच्या मर्यादा ओळखून आपले ध्येय निश्चित केल्यास असे ध्येय निश्चितपणे पूर्ण करता येते. आपल्याला आकाशातले तारे आवडले म्हणून काही ते आपल्याला मिळवता येत नसतात; पण तारे मिळाले नाहीत म्हणूनही दु:ख करीत बसायचे नसते. उलट जे आपल्या कक्षेत आहे किंवा आपल्या क्षमतेत आहे असे एखादे लक्ष्य समोर ठेवुन प्राप्त करायचे असते.

प्रत्येक काम श्रेष्ठच!

प्रत्येक जण आपल्या नव्या दिवसाची सुरुवात कुठल्या ना कुठल्या तरी कामापासून करतोच; पण ते काम कोणते आहे आणि कसे आहे, याचा विचार करण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? आपण त्या कामाची सुरुवात मन लावून आणि हृदयापासून करतो का? आपण विश्वास आणि निष्ठेने कामाला हात घालतो, की अपयशी भावना ठेवून ? त्यामुळे मनुष्याने कुठलेही काम हलके समजू नये. जगातले प्रत्येक काम हे श्रेष्ठच असते. महत्वाचे एवढेच की, ते काम आपण किती विश्वासाने पूर्ण करतो.