Thursday, March 25, 2010

टच टेक्नॉलॉजी

टच म्हणजे स्पर्श, स्पर्शाची अनुभुती कशी असते, हे भारतीयांना समजावून सांगण्याची नक्कीच गरज नाही. याच स्पर्शाचा वापर करुन आता अत्याधुनिक 'टच टेक्नॉलॉजी' चा जन्म झाला आहे. टच टेक्नॉलॉजीच्या उपकरणामुळे आता पेपर आणि वायरचा वापर बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी शाळेत हजेरी द्यावी लागत असे, नंतर नोकरी मिळाल्यावर ऑफीसच्या रजिस्टरमध्ये येण्या-जाण्याची वेळ लिहून सही करावी लागत असे. आता कार्ड पंचिग किंवा टच पंचिंग ही आधुनिक पध्दत सुरु झाली आहे. टच टेक्नॉलॉजी इतक्या मोठया प्रमाणात व झपाटयाने विकसीत होत आहे की, जग लवकरच पेपरलेस वायरलेस होणार आहे.
सिंगापूर येथील सायन्स सेंटरने आयलँड स्टेट्स इन्फोकॉम डेव्हलपमेंट ऍर्थारीटी सोबत जोडून हाय-फाय वायरलेस नेटवर्क उभारले आहे. कॉम्प्युटर किंवा डिजीटल पर्सनल कॉम्प्युटरद्वारे सरासरी 10,000/- चौरस क्षेत्रात हे नेटवर्क आहे. जग आता पेपरलेस-वायरलेस पध्दतीकडे वाटचाल करीत आहे. याचे उत्तम उदाहरण नॅशनल स्क्रीन सेंटर आहे. येथील पेपरलेस मेडीकल संस्था सर्व प्रकारच्या सुविधांनी युक्त आहे. याशिवाय अशा प्रकारच्या अनेक इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स आहे. या सिस्टिममध्ये वायर किंवा पेपर चा वापर होत नाही, यालाच टच टेक्नॉलॉजी युग असेही म्हणतात.

Wednesday, March 24, 2010

टेलीपॅथी कॉम्प्युटर

लंडन येथील शास्त्रज्ञांनी ''टेलीपॅथी कॉम्प्युटर'' ची संकल्पना मांडली आहे. हे कॉम्प्युटर मानवी मेंदूमधील हालचाली पाहून म्हणजेच मेंदूच्या ऑर्डर अभ्यासून त्यानुसार अचुकपणे कामे करुन शकतील. असे कॉम्प्युटर आगामी काळात विकसीत करणे शक्य आहे, असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
या शास्त्रज्ञांनी टेलीपॅथी कॉम्प्युटर सिस्टिमच विकसीत केली आहे. ही यंत्रणा मानवी मेंदूचे वाचन करुन त्यानुसार कामे करु शकतेत्र या प्रक्रियेत जुन्या आठवणींचीही नव्याने उजळणी होते. हे तंत्रज्ञान ''हिप्पोकॅम्पस'' या मेंदुतील भागावर केंद्रित करण्यात आले आहे. मेंदूच्या या भागात आपत्कालीन स्मृती साठवल्या जातात. हिप्पोकॅम्पस मधील स्मृती थोडा काळच लक्षात राहतात, नंतर त्या एकतर विस्मृतीत जातात किंवा मेंदू त्यातील भाग संग्रहित करुन ठेवतो. या यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी 10 स्वयंसेवकांना पाचारण करण्यात आले. त्यांना प्रत्येकी 7-7 मिनीटांच्या तीन डॉक्युमेंटरी दाखवण्यात आल्या त्यात प्रामुख्याने दैनंदिन कामे करणाऱ्या महिला दाखविण्यात आल्या होत्या. या डॉक्युमेंटरीज संपल्यानंतर या स्वयंसेवकांच्या मेंदुना ''एम.आय.आर. स्कॅनर'' जोडण्यात आले. नंतर पाहिलेल्या डॉक्युमेंटरीज क्रमानुसार आठवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. एम.आय.आर. स्कॅनरने स्वयंसेवकांच्या मेंदुतील रक्तप्रवाहाच्या परिवर्तनाची नोंद केली. या नोंदीवरुन कोणत्या स्वयंसेवकाने कोणती डॉक्युमेंटरी आठवली, हे कॉम्प्युटर सिस्टीमने अचूकपणे शोधून काढले. या सिस्टीमने 80 टक्के बरोबर उत्तरे दिली. ही सिस्टीम अजूनही विकसीत करणे शक्य आहे, असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Tuesday, March 23, 2010

''सी-डॅक'' चे नवं तंत्रज्ञान

पुण्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऍडव्हॉन्स कंप्यूटींग, सी-डॅकच्या संशोधन विभागाने बावीस अधिकृत भारतीय भाषांमधून कॉमेंट्री, स्कोअर बोर्ड तसंच सबटायटल्स अनुवादीत भाषांतरीत करणारं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. द डिजीटल ऑडीओ ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी या नावाने हे तंत्रज्ञान ओळखलं जाणार आहे. आगामी काळात दिल्लीत होणाऱ्या कॉमनवेल्थ गेमच्या वेळी सी-डॅक हे तंत्रज्ञान प्रेक्षकांना उपलब्ध करुन देणार आहे. या तंत्रामुळे प्रेक्षक क्रिडा समालोचन- कॉमेंट्रीसाठी बावीस भाषांमधून हव्या त्या भाषेची निवड करु शकतील. सध्या डी.व्ही.बी. - डीजीटल व्हीडीओ ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी प्रायोगिक अवस्थेत असून येत्या काही महिन्यांत हे तंत्रज्ञान व्यावसायीक स्वरुपात उपलब्ध होणार आहे.

भाषा निवडीचा पर्याय असणारा डी.व्ही.बी. सेट टॉप बॉक्स आवश्यक आहे आणि 3-जी टेक्नॉलॉजी उपलब्ध झाल्यावर हे तंत्रज्ञान मोबाईलमध्येही वापरता येईल. सी-डॅकच्या तेविसाच्या वर्धापनाच्या दिवशी लिप-लाईव्ह या नावाने हे तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यात आलं. क्रिडा क्षेत्राशिवाय ''लिप लाईव्ह'' टेक्नॉलॉजी शेअर मार्केट, बिझनेस न्युज चॅनेल वेदर रिपोर्टसाठी कसं वापरता येईल, यावर सी-डॅक तंत्रज्ञांची टीम काम करत आहे. प्रादेशिक वाहिन्यांसाठी दुरदर्शन तसंच खाजगी चॅनेल्स कंपन्यांनी हे तंत्रज्ञान वापरावं यासाठी सी-डॅक आणि डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी प्रयत्न करत आहे.

Tuesday, March 16, 2010

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


दिवस हा आनंदाचा जशी साखरेची पुडी, आयुष्यात या फडकुदे सुख सम्रुध्दीची गुढी, दु:ख नसुदे तुम्हाला कधीही, असो सुखाचा गोडवा, तुमच्या हास्याने बहरुन जावो " माझा गुढीपाडवा " नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Sunday, March 14, 2010

विंदा ना भावपुर्ण श्रद्धांजली


गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा' हे मराठीतील ख्यातनाम कवि, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना 'अष्टदर्शने' या साहित्यकृतीसाठी जाहीर करण्यात आला. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले.
विंदाचे वडिल 'विनायक करंदीकर' कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. रा.स्व. ते मार्क्स असा त्यांचा वैचारीक प्रवास राहीला पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाही. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्विकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय,मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते.
इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पूर्ण लेखनासाठी घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले आहे. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्विकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली आहे. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हे सुद्धा सामाजीक कार्यात सक्रीय असतात. तसेच त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.

विंदांचे समग्र वाङ्मय
विंदानी मराठी काव्यमंजुषेत विवीध घाटाच्या रंजक,वैचारीक,काव्यलेखनाने भर घातली मराठी बालकवितेची मुहुर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करुन कविता जनसामन्या पर्यंत पोहचेल असे पाहीले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांचे कडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषेस परिचय झाला. हा त्यांचा साहित्यिक प्रवास त्यांनी इ.स. १९८१ साली लेखन निवृत्ती घेउन यशस्वीपणे पूर्ण केला.

काव्यसंग्रह
* स्वेदगंगा (इ.स. १९४९)
* मृद्गंध (इ.स. १९५४)
* धृपद (इ.स. १९५९)
* जातक (इ.स. १९६८)
* विरूपिका (इ.स. १९८१)
* अष्टदर्शने (इ.स. २००३) (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार)

संकलित काव्यसंग्रह
* संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर)
* आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष)

बालकविता संग्रह

* राणीची बाग (इ.स. १९६१)
* एकदा काय झाले (इ.स. १९६१)
* सशाचे कान (इ.स. १९६३)
* एटू लोकांचा देश (इ.स. १९६३)
* परी ग परी (इ.स. १९६५)
* अजबखाना (इ.स. १९७४)
* सर्कसवाला (इ.स. १९७५)
* पिशीमावशी आणि तिची भुतावळ (इ.स. १९८१)
* अडम् तडम् (इ.स. १९८५)
* टॉप (इ.स. १९९३)
* सात एके सात (इ.स. १९९३)
* बागुलबोवा (इ.स. १९९३)

ललित निबंध
* स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८)
* आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५)
* करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६)

समीक्षा
* परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)
* उद्गार (इ.स. १९९६)

अनुवाद
* ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७)
* फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५)
* राजा लिअर (इ.स. १९७४)

अर्वाचीनीकरण
* संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर (इ.स. १९८१)

इंग्रजी समीक्षा
* लिटरेचर ऍज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)
* अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)

पुरस्कार आणि पदवी
* ज्ञानपीठ पुरस्कार : आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार रविवार जानेवारी ८, इ.स. २००३ रोजी जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वृत्त समजताच, "पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा सन्मान आहे. आज मी फक्त त्याचे केंद्र झालो आहे", अशा शब्दांत विंदांनी भावना व्यक्त केल्या.
* कबीर सन्मान
* जनस्थान पुरस्कार
* कोणार्क सन्मान
* केशवसूत पुरस्कार
* विद्यापीठांच्या डी.लिटस्

विंदांच्या शब्दात
विजया राजाध्यक्ष यांनी ग्रंथाली प्रकाशनाकरीता विंदाशी केलेल्या संवादात विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात, "वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पांप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." हे म्हणतानाच विंदा मराठी साहीत्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल खंतही व्यक्त करतात.

विंदांविषयी मान्यवरांचे विचार
मंगेश पाडगावकर
मंगेश पाडगावकर यांच्या शब्दात - "करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय तत्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचे होते. त्यामुळे प्रचाराचे बांडगुळ टाळून सामाजिक, राजकीय कविता लिहिणे कठीण होते पण विंदामधल्या कलावंताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. त्याच्या कवितेची शैली ही वक्तृत्वपूर्ण आहे. पण तरीही ती भाषणबाजी करीत नाही. करंदीकरांची प्रकृती ही तेचतेच दळण यशस्वीपणे दळत राहणार्‍या माणसाची नाही. तो सतत काहीतरी नवीन शोधत असतो. नव्या अनुभवांना भिडत असतो. काहीवेळा छंदाची मोडतोड करूनही आपला वेगळा छांदिष्टपणा प्रकट करीत असतो. करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे तसाच एक तत्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समिक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगानी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे. तेव्हा त्यांना मिळालेले 'ज्ञानपीठ' हे या सेवेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे."

मराठी साहित्यविश्वातील एक तारा निखळला. . विंदा ना भावपुर्ण श्रद्धांजली.

सर्वात मोठं पुण्य

दूस-य़ाला क्षमा करण्याइतपत सर्वात मोठं पुण्य दुसरं ते कोणतं?

पायाची उंची

रशियाच्या स्वेतलाना पॅन्क्राटोव्हा या महिलेच्या पायाची उंची ५१.९ इंच इतकी मोजली गेली होती.

आई-वडिल

तुम्ही तुमच्या आई-वडीलांची योग्य काळजी घेत नसाल, तर आपल्या मुलांकडुनही ती घेतली जाण्याची आशा बाळगु नका. मुलांविषयी जास्त मोह नसावा. कारण तीच मुलं आपले शेजारीही बनू शकतात. आपण काही मुलांचे मालक नाही; ट्रस्टी आहोत. आई-वडील बनणं ही आयुष्यातील मोठी घटना आहे; पण मुलांचे योग्य रितीने पालनपोषण करणे, ही पालकांची जबाबदारी आहे.

अफाट कल्पना शक्तिचा मालक

मानव म्हणजे जबरदस्त क्षमता, महत्वाकांक्षा, सामर्थ्य आणि कल्पनाशक्ती बाळगणारा प्राणी होय. त्याने जर मनापासून ठरवलं, तर तो ठरलेली कोणतीही गोष्ट पुर्णत्वास नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण, कल्पनाशक्ती त्याच्यात ठासून भरली आहे आणि याच अलौकिक कल्पना शक्तीच्या जोरावर तो अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करुन दाखवू शकतो.