Sunday, March 14, 2010
विंदा ना भावपुर्ण श्रद्धांजली
गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा' हे मराठीतील ख्यातनाम कवि, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना 'अष्टदर्शने' या साहित्यकृतीसाठी जाहीर करण्यात आला. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले.
विंदाचे वडिल 'विनायक करंदीकर' कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. रा.स्व. ते मार्क्स असा त्यांचा वैचारीक प्रवास राहीला पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाही. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्विकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय,मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते.
इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पूर्ण लेखनासाठी घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले आहे. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्विकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली आहे. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हे सुद्धा सामाजीक कार्यात सक्रीय असतात. तसेच त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.
विंदांचे समग्र वाङ्मय
विंदानी मराठी काव्यमंजुषेत विवीध घाटाच्या रंजक,वैचारीक,काव्यलेखनाने भर घातली मराठी बालकवितेची मुहुर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करुन कविता जनसामन्या पर्यंत पोहचेल असे पाहीले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांचे कडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषेस परिचय झाला. हा त्यांचा साहित्यिक प्रवास त्यांनी इ.स. १९८१ साली लेखन निवृत्ती घेउन यशस्वीपणे पूर्ण केला.
काव्यसंग्रह
* स्वेदगंगा (इ.स. १९४९)
* मृद्गंध (इ.स. १९५४)
* धृपद (इ.स. १९५९)
* जातक (इ.स. १९६८)
* विरूपिका (इ.स. १९८१)
* अष्टदर्शने (इ.स. २००३) (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार)
संकलित काव्यसंग्रह
* संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर)
* आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष)
बालकविता संग्रह
* राणीची बाग (इ.स. १९६१)
* एकदा काय झाले (इ.स. १९६१)
* सशाचे कान (इ.स. १९६३)
* एटू लोकांचा देश (इ.स. १९६३)
* परी ग परी (इ.स. १९६५)
* अजबखाना (इ.स. १९७४)
* सर्कसवाला (इ.स. १९७५)
* पिशीमावशी आणि तिची भुतावळ (इ.स. १९८१)
* अडम् तडम् (इ.स. १९८५)
* टॉप (इ.स. १९९३)
* सात एके सात (इ.स. १९९३)
* बागुलबोवा (इ.स. १९९३)
ललित निबंध
* स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८)
* आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५)
* करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६)
समीक्षा
* परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)
* उद्गार (इ.स. १९९६)
अनुवाद
* ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७)
* फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५)
* राजा लिअर (इ.स. १९७४)
अर्वाचीनीकरण
* संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर (इ.स. १९८१)
इंग्रजी समीक्षा
* लिटरेचर ऍज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)
* अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)
पुरस्कार आणि पदवी
* ज्ञानपीठ पुरस्कार : आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार रविवार जानेवारी ८, इ.स. २००३ रोजी जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वृत्त समजताच, "पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा सन्मान आहे. आज मी फक्त त्याचे केंद्र झालो आहे", अशा शब्दांत विंदांनी भावना व्यक्त केल्या.
* कबीर सन्मान
* जनस्थान पुरस्कार
* कोणार्क सन्मान
* केशवसूत पुरस्कार
* विद्यापीठांच्या डी.लिटस्
विंदांच्या शब्दात
विजया राजाध्यक्ष यांनी ग्रंथाली प्रकाशनाकरीता विंदाशी केलेल्या संवादात विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात, "वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पांप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." हे म्हणतानाच विंदा मराठी साहीत्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल खंतही व्यक्त करतात.
विंदांविषयी मान्यवरांचे विचार
मंगेश पाडगावकर
मंगेश पाडगावकर यांच्या शब्दात - "करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय तत्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचे होते. त्यामुळे प्रचाराचे बांडगुळ टाळून सामाजिक, राजकीय कविता लिहिणे कठीण होते पण विंदामधल्या कलावंताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. त्याच्या कवितेची शैली ही वक्तृत्वपूर्ण आहे. पण तरीही ती भाषणबाजी करीत नाही. करंदीकरांची प्रकृती ही तेचतेच दळण यशस्वीपणे दळत राहणार्या माणसाची नाही. तो सतत काहीतरी नवीन शोधत असतो. नव्या अनुभवांना भिडत असतो. काहीवेळा छंदाची मोडतोड करूनही आपला वेगळा छांदिष्टपणा प्रकट करीत असतो. करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे तसाच एक तत्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समिक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगानी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे. तेव्हा त्यांना मिळालेले 'ज्ञानपीठ' हे या सेवेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे."
मराठी साहित्यविश्वातील एक तारा निखळला. . विंदा ना भावपुर्ण श्रद्धांजली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment